केशकर्तनालय!या जागेशी माझं काय वाकडं आहे मला माहीती नाही.लहानपणापासुन कित्येक वेळा जायची वेळ येणारं असं हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं ठिकाण आहे.आणि कोणत्याच लहान्या पोराला न आवडणारी अशी ही काळ्या पाण्याची शिक्षा आहे!
आजच सकाळी कटींगला जायचा योग आला.देवाने आम्हाला भरभरुन केस बहाल केले असल्यामुळे सलुन मध्ये जायचा मौसम सारखाच येतो.कितीही प्रयत्न केला तरीपण दिड महीन्यातुन एकदा दर्शन घडतंच.मला आठवतयं,छोटा असताना मी फ़ारच कंटाळा करायचो कटींगला जायचा.तिथे जाउन त्या केसांच्या बाजारात बसायचा मला जाम वैताग यायचा.त्यात लहान असल्यामुळे केसांची स्टाईल वगैरे तर माहीतीच नव्हती."मिडीयम करु,का बारीक करु?"एवढा एकच ठेवणीतला प्रश्न तो बाबाजी विचरत असे.आणि शक्यतो वडीलच उत्तर देत असत.आमच्या शाळेचा एक उसुल होता,मुलांचे केस इतके बारीक हवेत की धरायला गेलो तर हाताच्या मुठीत पण येऊ नयेत वगैरे.त्यात आम्ही उनाड विद्यार्थी असल्या कारणाने शिक्षकांना निमित्तच हवं असायचं धरायला.त्यामुळे लहान केस कापायची इतकी सवय झाली होती की मिडीयम आणि बारीक सोडुन इतरही स्टाईल असु शकते हे मला engineering मधे आल्यावरच समजलं!
आधी आमच्या घरापासुन थोड्या दुर अंतरावर सलुन होतं.त्या काळी ’फ़िल्मफ़ेअर’,’सिनेब्लिटझ’वगैरे फ़िल्म रिलेटेड मासिकं ठेवणारा परिसरातला तो एकटाच दुकानदार होता.त्यामुळे कटिंगसाठी वेटिंग असलं तरी याच्याकडे हमखास गर्दी व्हायची!मी पण त्याच इराद्याने सकाळी सकाळी जाउन बसायचो त्याच्याकडे.रविवारी गेलं की नक्कीच २ महिन्याचे सगळे फ़िल्मी मासिकं चाळुन व्हायची त्यामुळे माझं त्या perticular दुकानाबद्दलचं प्रेम जास्तच उफाळुन यायचं.आणि का कोण जाणे,नाभिक समाजाशी माझी ओळख पण लवकरच होत असे.दर वेळी गेलो त्याच्याकडे की ’खास’ गिऱ्हाईक आल्याच्या अविर्भावात तो मला treat करत असे.इतकच नव्हे तर या धंद्यात पैसा कमावुन त्याने कसा वारजे माळवाडीत फ़्लॅट घेतला आहे याचे रसभरीत वर्णनदेखील तो दर वेळी करत असे!
सलुनमधली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे आतली टापटीप.अर्थात सगळीकडे ताज्या केसांचे पुंजके पडलेले असतात ते वेगळं;पण काचेची सजावट,चारही बाजुने लावलेले आरसे,लाकडी फ़र्निचरची रेलचेल,शेल्फ़मधे रचुन ठेवलेले कुठलेसे विदेशामधील भारीतले लिक्विड्स,क्रीम्स,सोप यांनी वातावरण अगदी भारलेलं असतं.बाजारात लाकडी फ़र्निचरचा कोणता नवा ट्रेंड आलेला आहे हे पाहण्यासाठी दुकानात जाण्यापेक्षा सलुन मधे जावं असं माझं फ़ार प्रामाणिक मत आहे.नक्षीकाम आणि कलाकुसर याचा लेटेस्ट बाजार तिथे मांडला असतो.हात घालाल तिथे ड्रॉवर्स,त्याच्या सोनेरी किंवा चंदेरी मुठी,चोहोबाजुने काचेचं महागडं स्टायलिंग,आत जाउन हे पाहील्यावर कधी एकदा त्या जादुच्या खुर्चीवर बसुन मुद्द्याला हात घालतो असं वाटत असतं.हो खरच,जादुचीच असते ती खुर्ची.Otherwise मानेचा सपोर्ट स्टॅन्ड वर खाली करता येऊ शकणारी खुर्ची आपण आणखीन कुठे पाहीली आहे?शिवाय उंची पुरत नसेल तर एक गोल आकाराची उशी आणुन,ती त्या खुर्चीवर ठेऊन त्यावर आपल्याला बसवायचे.मज्जाच मज्जा!तिथे बसेपर्यंत कोणत्याच बकऱ्याला त्यातला धोका कळत नाही.एकदा का तिथे बसलो की संपलं सगळं.मग ती ऑपरेशनच्या आधी घालायचा असतो तसल्या हिरव्या रंगाच्या गाऊनसारखा एक कपडा आपल्या गळ्याभोवती गुंडाळतात आणि बेफ़ाम कत्तलीला सुरुवात होते!तिथे ही आधी मिडियम का बारीक?हा ठेवणीतला प्रश्न असतोच;आजकाल मी पण त्याचं तोडीस तोड उत्तर शोधुन काढलं आहे."कमी करा,पण खुप बारीक नको!!"आता मला सांगा,या उत्तराने कोणाला काय समजणार आहे?तरी तो आपल्या निर्विकार स्टाईलने कैची उचलतो आणि बाजीप्रभुंच्या तलवारीसारखी यांची कैची चहुबाजुने फ़िरु लागते.
सुरुवातीला मागुन केस कापल्या जात असल्याने जरा आणखीन निरीक्षण करायची संधी मिळते.भारतातल्या जवळपास प्रत्येक सलुनमधे हमखास आढळणारी एक वस्तु म्हणजे वेगवेगळ्या पोजेस मधे केसांची ’हेअरस्टाईल’असलेले मॉडेलस!ते जवळपास प्रत्येक ठिकाणी सारख्याच लुकमधे असतात म्हणुन कदाचित ’नेहमीचे यशस्वी’या catagory मधे मोडतात!त्याहूनही पुढची मजल पहायची असेल तर बारकाईने या मॉडेलसकडे बघा.त्या उभरत्या कलाकारांमधे एक त्या कटिंग करुन देणाऱ्या माणसांपैकीच असतो!लग्गेच आपली नजर सगळ्यांवर फ़िरते.एखाद्याची चंपी करत तो तिथेच उभा असतो.आपण ते फोटो पाहुनच त्याच्याकडे पहात आहोत हे त्याला एव्हाना सरावाने समजतं.तो पण लगेच एक आश्वासक स्माईल देउन धंद्याला लागतो!या पोजेसचं सर्वात जास्त वैशिष्ठ्य म्हणजे बाहेर कोणीच तशी स्टाईल करत नाही.ते कसं असतं,फ़ॅशन शो मधले कपडे प्रत्यक्षात कोणीच घालत नाही ना,तसच काहीसं.ते कपडे फ़क्त तिथेच थोडावेळ मिरवायला असतात,शो संपला की काढुन आपापले कपडे घालुन सगळे घरी.इथेही तोच मामला.स्वतःवर ती स्टाईल कशी दिसेल ह्याचा आपण फ़क्त विचारच करु शकतो.कारण असं वळण देण्यासाठी आधी तितके मोठे वाढवावे लागतात केस.मनातल्या मनात आपणही मागुन वळवलेले केस,पुढून कोंबडा काढलेले केस,मधला भांग,सोल्जर कट,अर्धवट कल्ले ठेवलेला लूक असं सगळंच स्वत:वर ट्राय करुन पाहतो.त्यातही आणखीन धमाल म्हणजे या मॉडेल्सच्या डोळ्यावर गॉगलदेखील असतो!!आता गॉगलची इथे काय गरज आहे हे विचार करुनपण समजत नाहीच.किती तो कुल दिसण्याचा प्रयत्न!
अशी हेअरस्टाईल करुन द्यायची कोणतंच गिऱ्हाईक फ़र्माईश करणार नाहीये हे माहीत असल्याने जय्यत तयारीनिशी आपला जवान फ़ायनली केसात हात घालतो.स्प्रिंग लावलेल्या त्या बॉटलमधुन जेव्हा सर्वात पहिल्यांदा पाण्याचे तुषार डोक्याच्या परिघावर पडतात,तेव्हा समजुन घ्यायचं,की आपण आता त्यांच्या पुर्णपणे तावडीत सापडलो आहोत.पुढचा किमान अर्धा तास मान वेडीवाकडी वळवत डोक्यावरच्या वारणावताच्या जंगलाचा आता नाश होणार आहे.समॄद्धीने भरपुर अशा या प्रदेशातुन काय काय बाहेर पडेल या काळजीत आपण जीव मुठीत धरुन कत्तलीला सामोरे जातो.
डोक्यावर दाब देत देत कधी कधी नको असतानादेखील डोकं खाली दाबत आपला जवान केस कापायला सुरुवात करतो.साधारण १० मिनिटं झाले की "हं,आता इकडे बघा,आता तिकडे पहा"वगैरे बोलत तो साईडने कापाकापी करतो.जर नशीब चांगलं असलं तर थोड्याफ़ार गप्पापण होऊ शकतात.माझ्या चांगल्या नशीबामुळे मला कायमच गप्पिष्ट जवान मिळालेले आहेत.आमच्या समोरच्या दुकानातले सगळे लोकं एकाच फ़्लॅट मधे राहतात.हे दुकान जेव्हा टाकलं तेव्हा स्थानिक नगरसेवकाकडुन कसं उदघाट्न केलं होतं,त्यांनी पण आग्रह मानुन लगेचच कशी दाढी करवुन घेतली होती(!)वगैरे रम्य कहाण्या मी ऐकलेल्या आहेत.लगेच मी पण "अरे व्वा","हो का","क्या बात है!"वगैरे वगैरे शब्द उदगारवाचक चिन्हांसकट बोलुन त्याला खुष करुन टाकतो.दुपारी धंद्याला जोर नसतो म्हणुन मग कसा साईड धंदा म्हणुन ड्रायक्लिनींग आणि झेरॉक्सचं मशिन लावलं आणि कसा फ़ायदा झाला ही त्याची सक्सेस स्टोरी नक्कीच दाद देण्याजोगी असते.शिवाय गावाकडले तरुण पोरं,मामाचा मुलगा,आत्याचा नातलग वगैरे सगळेच जणं इथे येउन बसतात आणि फ़ावल्या वेळात धंद्यातली मर्म शिकतात.स्वतःही कमवावं,बाकीच्यांना मदत करावी अशी माफ़क समाजसेवा ते पण करतात.अपण बरं,आपलं काम बरं असा सरळ साधी विचार करणारी ही सामान्य माणसे आहेत.महत्वाचं म्हणजे त्यात कुठेही अभिमान अथवा अहंकार नसतो.
इतकं सगळं बोलत बोलत एकदाची कटिंग पण होऊन जाते.आणि आता दुकानातला सर्वात मनोरंजक प्रकार माझ्या समोर (खरं तर मागे)येतो.मानेच्या मागे वस्तरा लाउन तिथे ’शेप’ दिला की तुमची कटिंग संपली हे सप्रमाण सिद्ध होतं!आता तो मागे नेमकी कशी कापली आहे हे दाखवायला म्हणुन एक भला मोठा आरसा तुमच्या मानेसमोर धरतात!आता या प्रकारामुळे काहीही होत नसतं.आधीच कापलेले केस य दाखवादाखवीमुळे बदलणार तर नसतातच.उलट काही चुकलं असेल तर ते हायलाईट होतं!बरं,ते दुरुस्त व्हायची शक्यतापण धुसरच असते.तरी तो इमानेइतबारे तो आरसा धरतो,आपणही यांत्रिकपणे मान डोलवत बरोबर असं बोलतो(आणखीन काय बोलणार म्हणा!)आणि याचबरोबर एका नाट्यमय घटनेचा शोकात्मक अंत होतो!पुढचा दिड महीना तरी ते केस कापण्याइतके वाढणार नसतात आणि मला या जागी परत यायची वेळ येणार नसते.जड अंतःकरणाने मी तिथुन उठतो,बाजुला ठेवलेल्या अनेक कंगव्यांपैकी एक उचलतो आणि उरलेल्या केसांना वळण देण्याचा प्रयत्न करु लागतो.
अखेर तिथुन जायची वेळ येतेच.ठरलेले २५ रुपये देउन मी बाहेर पडतो.लहानपणापासुन माझं कटिंगसाठी annual budget ठरत आलेलं आहे.या दुष्क्रुत्त्यावर वर्षाकाठी १०० पेक्षा जास्त रुपये खर्च करायचे नाहीत ही लहानपणापासुन लागलेली सवय आहे!त्यामुळेच १०० रुपड्यात वर्षात ४-५ वेळा कटिंग होत असेल तर मी पण तितक्यांदाच करतो.आपला असा चोख हिशोब असतो बघा!कधी पैसे कमी पडले तर माझं कटिंगला जायचं प्रमाण पण कमी होतं!!तेव्हा मात्र मित्रांकडुन बोलणी,धमक्या खाव्या लागतात.कॉलेजला असताना मी एकदा १० महीने केस कापले नव्हते!!कधी कधी ते दिवस आठवुन माझं मलाच हसु येतं.आता हे सगळे बालिश प्रकार वाटतात पण त्या त्या वयात ते फ़ार exciting आणि धाडसी असतं.
कटिंगच्या प्रक्रियेमधे असलेल्या सगळ्या processes पुर्ण करुन एकदाचा मी घरी आलेला असतो.दर वेळी काहीतरी नवा अनुभव घेउन!
Sunday, April 19, 2009
Subscribe to:
Posts (Atom)