Wednesday, June 5, 2013

फ़ुकट तिथे फ़ॅमिलीसकट !

"हॅलो, कम्युनिटीमधे जेवण आहे आत्ता. येतोस का?" - मित्र
"कधी आत्ता? कोणी सांगितलं?" - मी
"अरे बोर्ड लावला आहे एट्रंस गेटच्या बाहेर. मी ऑलरेडी रांगेपाशी पोचलो आहे. तू येणार असशील तर लवकर पोहोच" - मित्र
"तिथे कुठे बसून खाणार रे? काहीतरी वाटतं ते!" - मी
"अरे हवं तर घरी घेउन जा. इथे सगळे असंच करतात. तू ये लवकर मी वाट पाहतो" - मित्र

माझं आणि मित्राचं मागच्या आठवड्याच्या मंगळवारी संध्याकाळी साधारण साडेसात वाजता झालेलं हे बोलणं. मी आणि सोनल घरात बोलतच होतो की संध्याकाळी जेवायला काय करायचं करुन. पण ही ’भगवानकी पार्टी’ऐकल्यावर वाटलं एकदम योग्य वेळी फोन आला. लगेच मी आमच्या वर राहणाऱ्या अजुन एका जोडप्याला फोन करुन आमच्यासोबत यायचा आग्रह केला.
 (भगवानकी पार्टी म्हणजे - अचानक कुठुन काही फ़ुकट मिळालं तर देवाचं देणं - अर्थात भगवानकी पार्टी म्हणाय़चं असं आमच्या मित्राने लावलेला नवीन शोध!)
ऍटलांटाला रहायला लागल्यापासुन मी आमच्या कम्युनिटीमधे बऱ्याचदा गेट टूगेदर बद्दल ऐकलं होतं. दर महीन्यातुन एकदा एक इवेंट होतो किंवा लंच/डिनर/ब्रेकफ़ास्ट असं काय काय असतं वगैरे वगैरे.असली सोशल सर्विस करणारं कम्युनिटीमधलं एक जोडपं घरी येउन जाहीरातही करुन गेलं होतं. त्यामुळे ’हे असतं तरी काय?’या भावनेपोटी आम्ही दोघंही कम्युनिटी हॉलपाशी दाखल झालो.
तशी आमची कम्युनिटी मोठी आहे. २ स्विमिंग पूल आणि जवळपास २५ बिल्डिंग्ज वगैरे आहेत. कम्युनिटी हॉल जिथे आहे तिथेच जिम, बार्बेक्यू करुन जीवनाचा आनंद लुटायची जागा, स्विमिंग पूल असा सगळा पसारा आहे. आमच्या घरापासुन साधारण ते अंतर ४०० मीटर असेल. घरातुन बाहेर पडताच कम्युनिटीमधले सगळे लोकं त्याच भागाकडे चालत जाताना आम्हाला दिसले. पुण्यात गणपती बघायला गेलो असताना,’जबरी डेकोरेशनचा गणपती’कुठे आहे याचा सुगावा लागल्यावर लोकांची गर्दी जशी तिकडे वळते; तशी ही गर्दी मला वाटली. त्यावेळी कम्युनिटीमधे जर कोणी पाहुणा आला असता तर नक्कीच बिचारा चक्रावून गेला असता एवढा असंतूष्ट मॉब पाहून.
जरा पुढे गेलो तर जवळपास प्रत्येक बिल्डिंगमधून लोकंच लोकं बाहेर येत होते. इतके लोकं मी तरी कधीच पाहीले नव्हते कम्युनिटीमधे. एका अर्थाने चांगलं पण वाटलं इतके भारतीय पाहुन. मिनी इंडिया बघितल्याचा फ़ील आला. (त्या दिवशीचं हे माझं शेवटचं चांगलं वाटणं होतं हे मला नंतर समजलं!)

हळूहळू अजून चार बिल्डिंग्जना वळसा घालून आम्ही हॉलपाशी पोचलो आणि अक्षरश: चक्रावुन गेलो. अरे इथे तर फ़क्त ’भारतीय’च आले आहेत! तोबा गर्दी नुसती. अगदी गावाकडली जत्राच जणू! आया आपापल्या पोरांना हाताला धरुन नुसत्या ओढत होत्या. फ़रफ़टत चड्ड्या सावरत लहान मुलांची वरात त्यांच्या मागुन चालली होती आपली. कशाचा कशाला पत्ता नाही. "ऑनसाइट" ला असलेल्या आपल्या मुलाकडे काही महीने रहायला आलेले त्यांचे वडील परीटघडीचे कपडे घालुन प्रामाणिकपणे रांगेत उभे होते. ह्या वडील लोकांचं एक चांगलं असतं बघा; बाहेर चला म्हणलं की लगेच फ़ॉर्मल कपडे घालून तय्यार! आपल्यामुळे लेकाला त्रास होऊ नये कसलाही. सगळ्या आयासूद्धा साड्या वगैरे नेसून खाली ’पॅरॅगॉन’अथवा ’हवाई’चप्पल घालून कार्यक्रमाचा आनंद लूटायला पोचल्या होत्या!
तर, असा नजारा पहात आम्ही कसेबसे गर्दीतुन वाट काढत सरपटणाऱ्या रांगेच्या अंताला पोचलो एकदाचे. जिम आणि पत्रपेटीची भिंत याच्या मधल्या बोळातल्या एका बारक्या प्रवेशद्वारामधून निमंत्रितांना आत प्रवेश दिल्या जात होता.त्याच जागेतुन आतल्या अन्नाचा लाभ घेतलेले तृप्त लोकं ढेकरा देत देत बाहेर पडत होते. काही नशीबवान लोकांच्या हातात मी भरलेल्या प्लेट्स पण पाहिल्या. एकंदरीतच आत काय पहायला, खायला आणि भोगायला मिळणार आहे याची जराशी झलक मिळाली तिथे.
रांगेत किमान २५ लोकं तरी असतील आमच्या समोर उभी. लहान मुलं ’आमचा नंबर कधी लागणार, पप्पा?’च्या अविर्भावात आयांचा हात धरून कशीबशी उभी होती बिचारी. कोणाला तेव्हाच नेमकं पकडापकडी खेळायची होती तर कोणाला घरीच जायचं होतं. प्रत्येकाचा वेगळा मूड. बापांच्या चेहऱ्यावर’सांगितलेलं तुला! काही अर्थ नाहीये इथे थांबण्यात’वाला मूड होता. हे पाहुन तर अगदी पोटात गोळाच आला माझ्यातर.
एकदाचे आम्ही धक्काबूक्की करत आत पोचलो. बघतो तर काय, घोर निराशा हा शब्ददेखील कमी पडेल असा नजारा नशीबी आला! दोन्ही बाजुंना टेबलं मांडून स्वयंसेवक थंडगार झालेल्या पिझ्झ्याचे २-२ तुकडे एका प्लेटमधे टाकून हसल्यासारखा चेहरा करत भारतीयांच्या गळ्यात मारत होते. मी हातात प्लेट घेतली तर त्या गोऱ्याने माझ्याकडे - "आला हा फ़ुकटा खायला" वाल्या नजरेनी पाहीलं; चीज पिझ्झा हवा का ग्रीन पेपर? असं विचारत दोन तुकडे टाकले आणि पुढे रवानगी केली. तिरुपतीच्या मंदीराच्या गाभ्यातही यापेक्षा जास्त वेळ उभं रहायला मिळालं होतं मला! त्याच्या नजरेतला थंडपणा त्या पिझ्झा मधे उतरलेला होता! स्वयंसेवकाचं काम हे अगदी थॅंकलेस असतं हे फ़ार तीव्रतेने जाणवलं मला. इतकी गर्दी आणि एकंदरीतच कधी काही मिळालं नसल्याचा फ़ील देणारे लोकं पाहुन, कुठुन या ऍक्टिविटी मधे नाव रजिस्टर केलं असं नक्की वाटलं असणार त्यांना. सिनेमा हॉलच्या बाहेर उभा असलेला गेटकीपर जसा असतो, तिकीट पाहून आत सोडतो; तसा अनुभव. लोकांच्या गराड्यात प्लेट्स चा अंदाज घेत टाका आपले पिझ्झे त्यात!
त्याच तात्पुरत्या उभ्या केलेल्या टेबल्सच्या भवती संपलेल्या पिझ्झा बॉक्सेसचा गराडा पडला होता. किमान शंभर लार्ज पिझ्झा बॉक्सेस असणार तिथे. भुकेलेल्या लोकांनी क्षणार्धात फ़स्त करुन टाकलं सगळं! आमच्या हातात प्लेट यायला जवळपास ८ वाजले होते म्ह्णजे सांगितलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास जास्त. त्यात साधारणत: ३०० माणसं येउन खाउन पण गेली होती.चेहऱ्यावर उसनं हसू आणत, लहान मुलांशी चेष्टामस्करी करत ते लोकं पटापट प्लेट्स लावत होते. मधेच नजर वर करत वाढती रांग आणि कमी होत चाललेले पिझ्झे याचा अंदाज लावत यांत्रिकपणे हात चालवत होते ते लोकं. ४ जणंच होते म्हणा पण करत होते बिचारे. पलीकडेच वेगवेगळी शीतपेयं अर्थात कोक, पेप्सी, स्प्राईटच्या लार्ज बॉटल्स ठेवल्या होत्या. थंडगार पिझ्झ्याचे तुकडे घशाखाली ढकलायला मती सुन्न करणारं द्रव्यच लागू पडणार ना. त्याशिवाय अन्न पचणार कसं? आपापल्या ग्लासेस मधे कोक ओतून घेऊन जागा शोधत असताना मागे वळुन पाहीलं तर काय? लोकं परत परत घ्यायला येत होते! हे पाहुन तर अगदी शरमच वाटली मला. सोनल तर हे सगळं बघून घरी जाऊया, घरी जाऊया चा घोष करायला लागली. पण सगळा ग्रुप दिसल्यावर आम्ही तिथेच थांबायचं ठरवलं.
मित्रांसोबत बसुन गप्पा मारताना अजून किस्से समजले आजच्या या सोहळयाचे. काही लोकं म्ह्णे घरून "वॉलमार्ट" च्या पिशव्या घेऊन आलेले होते. दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या ब्रेकफ़ास्टची सोय व्हावी म्ह्णुन! एक आज्जी होत्या म्हणे, त्यांनी तर कहरच केला. सगळ्या घरच्या लोकांच्या वाटणीचं भरुन आल्यानंतर एक एक करत पिशवी मधे कोंबलं आणि सर्वांच्या देखत निघुन गेल्या चक्कं! ऑर्गनायजर्सने मित्रांना वगैरे बोलवा असले निमंत्रण दिले होते तर आपले लोकं त्याचा मान राखुन इतर कम्युनिटीमधे राहणाऱ्या लोकांना घेऊन आले होते. ते पण सगळे सकाळपासून उपास धरलेले; इथेच सोडायचा हट्ट! कार काढुन आले ४-४ लोकं!

काय म्हणावं या प्रकाराला आता. लाज काढायचे धंदे सगळे! बरं, त्यांच्या घरच्यांना पण काही नाही त्याचं. "असंच करत असतो आम्ही" हा तोरा. त्यात ही म्हणे सो कॉल्ड पूल साईड पार्टी! म्हणजे लहान मुलांना तर अगदी उतच यायला हवा. कधी एकदा खातो आणि पाण्यात जातोय अशी त्यांची भावना. सगळ्या आया पण पॅंट, पायजामा, जीन्स हलकेच फ़ोल्ड करुन जेमतेम पोटरी आत जाईल इतका पाय पाण्यात सोडून "थोडकेमे मजा" वाल्या स्टाईलने बसल्या होत्या. एक एक पिझ्झा संपला की पोरांना अजून उत्साह चढायचा. आणि लाडकं पोर म्हणल्यावर आई वडील तरी काय बोलणार?
लवकरच त्या पूल मधे १-२ पेपर प्लेट्स, ३-४ कोकचे डिस्पोजेबल ग्लासेस आणि तत्सम पदार्थ तरंगायला लागले! उत्साही नवऱ्यांनी आपापले ’डिएसएलआर’बाहेर काढुन ते क्षण टिपायला सुरुवात केली. सगळे खुष. काढणारे आणि काढुन घेणारे! कुणी काठावरुन सायकल चालवतंय, तर कुणी पकडापकडी खेळतंय. मुली एका पायाने जोर देत ढकलत पुढे जाणारं सायकल सदृश वाहन खेळत गोंधळात भर घालतंय. तर उरलेली लहान मुलं पाण्यात शिरुन बॉल अथवा पाणी उडवण्यात धन्यता मानतंय. गलिच्छ्पणा आणि अव्यवस्थितपणाचा कहर. आपल्यासाठी अगदी शोभेलसी परिस्थिती!
कदाचित आम्ही नवीन असू या दृष्यांना किंवा परक्या देशात इतके भारतीय लोकं पहायची सवय नसेल कदाचित. पण फ़ारच अनकंफ़र्टेबल होतं ते सगळं. मला प्रवासवर्णनं वाचायला कायम आवडतात. मनापासुन एंजॉय करतो मी ते. अमेरीकेला यायच्या आधी मी जाणीवपुर्वक खुप प्रवासवर्णनं वाचली. हौशा नवश्यांनी लिहिलेली आणि प्रॉपर लेखकांनी लिहिलेलीसुध्दा. बऱ्याच लोकांनी हे नोटीस केलं होतं की आपल्याच लोकांमूळे बाहेरच्या देशात शरम वाटायची परिस्थिती येते. आणि पार उदाहरण देऊन लिहिलं होतं.आज अगदी अनूभव आला त्याचा! गेल्या १५-२० वर्षांत विदेशी आपले लोकं असायचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यात अमेरिकेमधे तर पार गर्दीच आहे. आमच्या कम्युनिटीमधे दाक्षिणात्य लोकं भरमसाठ आहेत. खरं सांगायचं झालं तर ऍटलांटामधे राहणाऱ्या भारतीयांपैकी ७० टक्के हे नक्कीच दक्षिण भारतीय असणार. आपल्याला भारतात राहुनदेखील दोघांमधला फ़रक किती जाणवतो. इकडे तर पावलोपावली त्याची झलक दिसते.
इतका गार आणि मेलेला पिझ्झा आम्ही आयुष्यात कधीही खाल्लेला नव्हता. अतिशय घाणेरडा, अंगावर येणारा अनुभव आला आज. "फ़ुकट तिथे फ़ॅमिलीसकट !" म्हण प्रत्यक्षात पहायला लावणारा ! परत कधीही असल्या गेट टुगेदरला यायचं नाही असा पण करुन मी आणि सोनल पळालो तिथुन !