Thursday, October 9, 2008

मुर्तिमंत चेष्टा !!

तुम्हाला जमतं आपणहुन स्वतःला मनस्ताप करुन घ्यायचा?मला जमतं !कसं सांगु,काय़ करायचं ना,जिथे जाउन आपल्याला त्रास होणार आहे(हे माहीती आहे)अशा ठिकाणी जायचं.अशाच एका ठिकाणी भेट द्यायचा योग मी घडवुन आणला.रविवारच्या रम्य सकाळी PBAP(Promoters and Builders Association of Pune) यांनी मांडलेल्या एका थट्टेला मी जाउन आलो.बाकीचे लोकं त्याला प्रदर्शन म्हणतात!अहो,प्रदर्शन कसलं,प्रत्येक स्टॉलवर चेष्टा मांडली होती.आणि आमची मजा पहायला भाड्याने आणलेले मॉडेल्स उभे केले होते.
सकाळी ११ वाजता मी सर्वात आधी जाऊन पोचलो त्या SSPMS च्या ground वर.बघतो तर काय,पोलिसांना पण आवरणार
नाही इतकी मोठी वाहनांची गर्दी आणि त्यातुनच वाट (आणि घर)शोधत चाललेले आपले जागरुक अन चोखंदळ पुणेकर!हॉल मध्ये जाण्याकरता अक्षरशः चढाओढ चालु होती तिथे.त्यातच नव्याने भरती झालेले आपले Traffic वार्डन्स.इतका गोंधळ तर चतुर्श्रुंगीच्या जत्रेमधे पण नसेल.बिचारे सगळे जणं इतके गोंधळात पडले होते,कोणाला कूठुन,कुठे,कशाला सोडाय़चं की
वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ वाजलेला होता.अशातुनच कशीबशी वाट काढत मी,अतुल आणि निलेश(उर्फ़ काका)कसेबसे त्या मोठ्या हॉलपाशी एकदाचे पोहोचलो.तोपर्यंत साधारण परिस्थितीचा अंदाज मला यायला लागला.म्हणलं,आपलं काही आज खरं नाही.आत प्रचंड गर्दी दिसते आहे.पण अहो आश्चर्यंम,आतमधे तर रिलेटीव्ह्अली कमी गर्दी निघाली.आत शिरता शिरता दाराशी उभ्या असलेल्या अनेक स्वागतसुंदरींपैकी एकीने आम्हाला ’पास’ नाही म्हणुन अडवलं.परत पास बनवायला आणखीन एक रांग.त्यातुन कसेबसे वाट काढत एकदाचे आतमधे पोचलो आम्ही.
आत गेल्यागेल्या अलिबाबाच्या गुहेमधे शिरल्यासारखा भास झाला मला.जिकडे पहावं तिकडे घरंच घरं.जो तो आपला potential buyers पकडुन,"आमचीच स्कीम कशी चांगली आहे,आमचेच घरं कसे(इतरांपेक्षा)स्वस्त आहे"अशा बढाया मारण्यात रमलेला होता.एखाद्या श्रीमंताच्या लग्नामधे जशी उंची खाद्यपदार्थांची रेलचेल असते तशी बाणेर,बालेवाडी,कोंढवा,
खराडी, पाषाण-सुस रोड,पिंपळे सौदागर,पिंपळे निलख,एनआयबिएम रोड,औंध,वारजे अशा श्रीमंत एरियांची रेलचेल होती.
मुंबईमधे आल्यावर एखाद्या गावकरयाचे डोळे दिपतात म्हणजे नक्की काय होतं ते मला इथे येउन समजलं.कुठून सुरुवात करावी हे समजेना म्हणुन साधारण(बावळट)दिसणारया एका स्टॉलवरच्या माणसाकडे आम्ही गेलो.आता विषयाला कोण सुरुवात करणार हे कळेना त्यामुळे मीच हात घातला.

"मला,तुमच्या नवीन schemes बद्दल थोडी माहीती हवी होती".
"हो हो,या बसा ना!"तोंड भरुन आमचं स्वागत करण्यात आलं.बहूदा सकाळपासुन आम्हीच पहीले थोडा ’स्पार्क’असलेले ग्राहक
वाटलो असु त्याला.चांगले कपडे असे कुठेही कामाला येतात बघा!
"अं..पिंपळे सौदागरला आपली नवीन building उभी राहते आहे.१२ मजल्यांचे १३ टॉवर्स.हा प्लान पहा.१०४५ total एरिया आणि ९१२ built-up पडेल बघा साधारण.हे असं इकडुन आत शिरलं की आधी चप्पल बुटांचा stand लागेल."
सावज हाती आलं की वाघ सिंह कसे त्यावर तुटून पडतात,तसा तो सेल्समन आमच्यावर आला.
"साधारण पाहीलं तर एकंदरीत ५७ amenities देतो आपण.त्यात मेन म्हणजे concealed gas,wooden flooring,बाथरुम मधे italian marble,सौना बाथ,स्वयंपाकघरात सगळीकडे टाइल्स,oil bound distemper,
children's play area,नाना नानी park अशा काही सोयी आहेत".हे लोकं ना,कशालाही amenities चा मुलामा चढवुन ग्राहकाला मुर्खात काढायला बघतात.ह्या असल्या amenities ऐकुन कंटाळलो होतो आम्ही लोकं.तरी त्याची अखंड बडबड मात्र चालुच होती.
"नक्की कुठे आहे ही स्कीम?"निलेशला आणखीन एक अडचणीमधे आणणारा प्रश्न सुचला.
"ही बघा,औंध ऍनेक्सला आहे".
"हो पण म्हणजे नक्की कुठे?"
"पिंपळे सौदागर".त्याने भीत भीत उत्तर दिलं.
आता मला सांगा,या पिंपळाला कोणी ऍनेक्स म्हणेल का? अहो किती दुर आहे ते ऍक्चुअल औंधपासून.हे असच चालत राहीलं तर एखाद दिवशी सातारयाला धनकवडी ऍनेक्स म्हणायला ही लोकं कमी करणार नाहीत!
माझ्या मनातले असे विचार बहुदा त्याने ओळखले असावेत.परत त्याची टकळी चालू झाली.
"अहो पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आपली बिल्डिंग परिहार चौकापासून.चौकात पोचलं की घरी फ़ोन करुन बायकोला चहा टाकायला सांगायचं.चहा उकळायच्या आत तुम्ही घरात!".
"सध्या भाव काय चालु आहे इथे?" त्याला मधेच तोडत मी प्रश्न केला आणि परीक्षेत नापास होणार हे माहीती असलेल्या मुलाच्या चेहरयावर रिझल्ट घेताना जसे भाव येतात तसे त्याच्या चेहरयावर आले.’लाख’ मोलाचा प्रश्न मी त्याला विचारला होता अन ’कित्येक लाख’मोलाचं उत्तर आता तो देणार होता.
"या प्रदर्शनानिमित्त असलेला आमचा डिस्काउंटेड रेट आहे ३८००/-पर स्क्वेअर फ़ुट.अजुन १ महिन्याने ४००० होईल."असं उत्तर देउन त्याने मोठ्या आशेने आमच्याकडे बघितलं.शपथ घेउन सांगतो तुम्हाला,१ मिनिटासाठी कोणीच काहीच बोललं नाही.मनातल्या मनात जेव्हा फ़ायनल किंमत काढुन झाली तेव्हा मात्र संताप,तिडीक,राग,असहाय्यता अशा सगळ्या भावनांचं एक मिश्रण तयार झालं.अरे,सगळे खर्च धरुन ४५ लाखांच्या वर चाललं होतं ते घर!कोण घेणार?कुठुन आणणार एवढे पैसे?

गेले अनेक महिने पुण्यामधे याबद्द्ल गावगप्पा चालु आहेत.आज तुम्ही कोणत्याही आयटी कंपनीच्या आवारात,कॅफ़ेटेरियात,
कॅंटिनमधे जाऊन पहा,सर्वजण घराच्याच गप्पा मारत असतात.कोणी एखादा कोणत्यातरी मित्राचा दाखला देतो.बॅंकेने व्याजदर
वाढवले तर कसे त्याच्या १८ वर्षाच्या लोन पिरियड्चे २० वर्ष झाले,किंवा २ वर्षापुर्वी २१०० ने बुक केलं असल्यामुळे बिल्डर अजुनही ताबा कसा देत नाहीये वगैरे.आणि अशा विषयांना सध्या अंत नाही.लगेच मग कोणी पुढे सरसावत आपल्या बिल्डरसोबत भांडण करुन कशा घरामधे सोयी करवुन घेतल्या याच्या सक्सेस स्टोरीज़ सांगत सुटतो.थोडक्यात सांगायचं झालं तर आज आपल्यापैकी almost प्रत्येक जण या’घरघरीचा’शिकार झालेला आहे.केवळ आयटी मधे काम करतो म्हणजे सगळ्या सुखसोयी आणि अविश्वसनीय पगार हे काही प्रत्येकालाच लागू होतं असं अजिबात नाही.पण हे त्यांना कसे पटणार?त्यांच्या द्रुष्टीने तर आयटी ची माणसं म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच झाली आहे जणू.महागाई वाढली,धरा आयटीला जबाबदार,
मॉल संस्क्रुती पुण्यात रुजली,घरांच्या किंमती वाढल्या,पकडा आयटीला.अर्थात यात त्यांचा वाटा काहीच नाही असं तर मी म्हणणार नाही.पण किती दिवस याचं advantage बिल्डर्स घेणार?

सगळीकडे आज एकच रोना आहे.जागांचे भाव कमी होत नाहीत त्यामुळे potential buyersना घरं घेता येत
नाहियेत.आणि कारणं काहीही असोत,बिल्डर घराचे भाव कमी करत नाहीयेत.या खेळामधे कोण आधी वार करतो किंवा कोण आधी हार मानतो हे पहायचं आहे.इथे प्रत्येकाला ठाउक आहे की आजच्या घडीला जागेचा जो भाव आहे तो वाढवलेला आहे,artificial आहे.त्या त्या जागेची लायकी नसताना केवळ वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे.म्हणुन तुर्तास ’थांबा आणि वाट पहा’असा मंत्र अवलंबल्या जाऊ शकतो.पण ज्यांना घराची घाई आहे त्यांचं काय?ते तर बिचारे फ़सलेच ना?

आज पुण्यामधे किमान ५० तरी नवीन कंस्ट्रक्शन्ज़ चालु असतील.त्यामधे बकरे मिळायला बिल्डर्सना जास्ती वेळ लागत नाही.राजा श्रीमंत होत चालला आहे अन प्रजा गरीब होत चालली आहे.किती दिवस चालणार हे सगळं?

असले सगळे विचार माझ्या मनात येउन गेले.तो गरीब बिचारा सेल्समन आमच्या उत्तराची वाट बघत दुसरया
गिरहाईकाकडे वळला होता.अशा तरहेने अपमानित होऊन आम्ही तिथुन निघालो आणि स्वारी दुसरया स्टॉलकडे वळली.पहिल्या आणि दुसरया स्टॉलमधे फ़रक इतकाच होता की दुसरया ठिकाणी broture बरोबर एक छान प्लास्टिकची पिशवी मिळत होती!!तरीच म्हणलं त्यांच्या स्टॉलवर इतकी गर्दी का होती ते ! लवकरच आजुबाजुला सारख्या पिशव्या बाळगुन फ़िरणारे लोकं दिसायला लागले. ते नाही का,घराजवळ रिलायन्स फ़्रेश किंवा सुभिक्षा उघडलं की परिसरातल्या सगळ्यांच्या हातात त्यांच्या रंगीत पिशव्या दिसायला लागतात,तशातला प्रकार होता तो!प्रत्येक स्टॉलवर थोडा थोडा अपमान सहन करत करत कसाबसा एक सेक्शन संपवला तर पाहतो काय? आणखीन २ हॉल बाकी होते.याचा अर्थ ३ हॉलमधे मिळुन त्यांनी थट्टा मांडली होती!
’पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’च्या धर्तीवर ,exhibition अभी बाकी है मेरे दोस्त..असं म्हणायची वेळ आली.परत नव्या जोमाने आम्ही घरं हूडकायला सुरुवात केली आणि ३ तासांच्या या थरारनाट्यामधुन कसेबसे बाहेर पडलो!!

गाडीपाशी जाताना माझ्या मनात,घराच्या संदर्भात जास्ती काही हाती लागलं नाही यापेक्षा भाजी घ्यायला एक छानशी पिशवी मिळाली आणि साधारण एक किलो रद्दी जमली याचाच आनंद होता !!!