Friday, February 6, 2009

शोले!

शोले!! यापेक्षा काही भारी,मोठं,उत्कृष्ठ,भव्यदिव्य,अविश्वसनीय,इतक्या प्रचंड प्रमाणावर होऊ शकतं का परत? किती ही इतिहासाच्या आत पार वाकुन पाहीलं तरीपण उत्तर नकारार्थीच येईल.खरं तर गरजच काय आहे वाकुन पहायची?ज्या पिक्चरला हिंदी चित्रपटाच्या जवळपास ७५ वर्षांच्या इतिहासातला सर्वोत्तम पिक्चर म्हणुन गौरवण्यात आलं आहे,तिथे तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या सर्टिफ़िकेट्ची काय गरज?बस्स,नाम ही काफ़ी है!काय काय म्हणुन नाही आठवत या पिक्चरबद्दल? त्या काळची सर्वात तगडी स्टारकास्ट,झालेला अवाढव्य खर्चं, बनवण्यास लागलेला वेळ,हवे ते कलाकार न मिळाल्यामुळे secondary choice असलेल्या कलाकारांसोबत करावं लागलेलं काम,अमर झालेली जवळपास सगळी पात्रं शिवाय शोलेशी रिलेटेड असलेल्या सगळ्या कथा,काही दंतकथा सगळी कहाणी एका झटक्यात नजरेसमोरुन सरकते.समीक्षक,परीक्षक,सामान्य प्रेक्षक सर्वांनी वाखाणलेला शोले जेव्हा १५ ऑगस्ट १९७५ ला रीलीज झाला तेव्हा अवघ्या २ दिवसात पब्लिकने आपल्या नापसंतीची मोहोर त्यावर लावुन टाकलेली होती.
"भिकार पिक्चर!हात नसलेला माणुस काय असा २ भाडोत्री गुंडांना बरोबर घेउन व्हिलनला मारतो काय?बकवास!"शो बघुन बाहेर येणाऱ्या जवळपास थोड्याफ़ार फ़रकाने अशीच reaction देत होते.नाही म्हणायला पिटातल्या प्रेक्षकांना मात्र हा मारधोडीचा मसालापट आवडला होता;पण एकंदरीत चित्र काही फ़ार चांगलं नव्हतं.लगेचच अमिताभच्या घरी एक आपात्कालीन बैठक बोलावण्यात आली. अमिताभ,जया,धर्मेंद्र,हेमा,रमेश सिप्पी,अमजद खान आणि सलीम-जावेद असे सगळे stakeholders हजर होते."पिक्चरची लांबी फ़ार आहे.आधीच ३ तासांच्या वर गेला आहे पिक्चर.थोडी रिळं कापुयात आणि काही भाग री-शूट करुयात."कुणीतरी सुचवलं.परंतु सिप्पी साहेब शांत.ते फ़ारसा बदल करण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेवटी बऱ्याच चर्चेनंतर असं ठरलं की काहीही फ़ेरबदल न करता आहे तसा पिक्चर चालु ठेवायचा.झालं.शेवटी व्हायचं तेच घडलं!सोमवारपासुन हळुहळु माऊथ पब्लिसिटीने पिक्चर वर चढायला लागला.लोकांना गब्बरचा थरार,जयचा संयत अभिनय,वीरुचा रांगडा अवतार,हेमाची वाह्यात बडबड,ठाकुरचा सुडाने भरलेला प्रवास यातलं काही ना काही आवडायला लागलं.आणि नंतरचा अदभुत प्रवास तर जगजाहीर आहे.
तसं बघायला गेलं तर सरळ साधी स्टोरी आहे पिक्चरची.मुळचा रामगढचा असणारा पोलिस इन्सपॅक्टर ठाकुर एका गब्बरसिंग नावाच्या कुख्यात गुंडाला चकमकी मधे पकडतो.त्याचा सुड म्हणुन गब्बर जेलमधुन पळुन जाऊन ठाकुरच्या संपुर्ण कुटुंबाची निर्घुण हत्या करतो.त्याच्याशी दोन हात करायला गेलेल्या ठाकुरला आपलेच दोन हात गमवावे लागतात.शेवटी पुर्वी आपल्याच (असलेल्या) हाताखालुन गेलेल्या दोन गुंडांना हाती घेऊन ठाकुर गब्बरचा नायनाट करतो!वरवर साध्या वाटणाऱ्या या स्टोरीमधे भरपुर मालमसाला भरलेला होता.आणि याला सर्वाधिक फ़ुलवण्याचं काम केलंते सलीम-जावेद या संवाद लेखकांच्या द्वयीनं.साध्या वाटणाऱ्या स्टोरीलाईनला केवळ पॉवरफ़ुल डायलॉगच्या द्वारे एका अदभुत पातळीवर आणुन ठेवण्याचं काम ही जोडी कायम करत असे.प्रत्यक्ष डायलॉग लिहायच्या वेळी सलीम सवाल तर जावेद जवाब अ़सं करत करत ते सीन्स पुर्ण करत असत.दोघेपण आपापल्या क्रिएटिव्ह जवानीमधे,शिवाय काहीतरी जबरदस्त करुन दाखवायची उर्मी यामुळे अतिशय तडफ़दार संवाद लिहुन त्यांनी दिग्दर्शकाचं काम आणखीन सोपं करुन टाकलं होतं.पुर्ण मारामारीच्या या पिक्चर मधे त्यांनी इमोशन,रोमान्स,कॉमेडी,त्याग या सर्वांचा वापर अतिशय खुबीने केलेला होता.शोलेचं एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याची पटकथा घट्ट बांधलेली होती.कुठेही या जोडीने कथेवरची आपली हुकुमत घालवली नव्हती.प्रत्येक character असं सेट होतं.गडबड,गोंधळ नाही.इंद्रधनुष्याचे सात रंग कसे एकत्र असले तरी प्रत्येकाचं आपापलं स्वतंत्र अस्तित्व असतं,प्रत्येकाची वेगळी आयडेंटिटी असते,तसंच काहीसं झालं होतं या प्रमुख पात्रांचं.प्रत्येकाचा रोल defined होता.अर्थात यात कुण्या एका व्यक्तिरेखेवर नकळतदेखील अन्याय होणार नाही याची खबरदारी लेखक जोडीने आधीच घेतलेली होती.असे केल्याने ठाकुर,जय,वीरु,गब्बर,राधा,बसंती ही प्रमुख पात्रे तर भाव खाउन गेलीच,पण ५-१० मिनिटांच्या छोट्या छोट्या भुमिकेमधे असणारे कलाकार जसे की सांभा,कालिया,ईमामचाचा,हरीराम नाई,मौसी,रामलाल,सुरमा भोपाली,देखील आपला ठसा उमटवुन भारतीय प्रेक्षकांच्या मनात दिर्घकाळ रेंगाळली.किती भारी असेल ना रमेश सिप्पी?आपल्या हातुन भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वोत्तम कलाकृती बनणार आहे ही कल्पनाच किती exciting असेल ना?काय फ़ौज उभी केली होती त्यांनी!अभिनेते,लेखक तर होतेच दिमतीला,पण द्वारका द्विवेचांसारखा जबरदस्त कॅमेरामन त्यांनी उभा केला होता.जेव्हा शोले बनवायचा ठरला त्यावेळी रामगढ्चं लोकेशन फ़ायनलाईज करायला द्वारका द्विवेचा आणि रमेश सिप्पी गावोगाव भटकले.मनासारखं ठिकाण काही सापडेना.बंगलोर मधल्या कुणीतरी सुचवलं,बंगलोर-म्हैसुर हायवेवर एक रामनगरम् नावाची जरा खडकाळ जागा आहे.ती कदाचित तुमच्या उपयोगाला येऊ शकेल.लागलीच आपली दुक्कल तिथे जाऊन लोकेशन फ़ायनल करुन आली.द्वारका द्विवेचांच्या डोळ्यासमोर दगडांच्या चढावावर गब्बरच्या घोड्याच्या मागे पाठलाग करणारा ठाकुर दिसत होता.एक महान कलाकृती हळुहळु आकार घ्यायला लागली होती!जसं लोकेशन फ़ायनल होत गेलं,इकडे ऍक्टर्सचं सिलेक्शन हळुहळु होत गेलं.बसंतीची भुमिका हेमा करेल आणि राधाच्या रोलसाठी जया भादुरी फ़िट्ट बसेल हे साधारण आधीच ठरलं होतं.जयाने जयच्या रोलसाठी अमिताभच्या नावाचा आग्रह धरला.लक्षात घ्या,ही गोष्ट आहे १९७३ च्या सुमारासची जेव्हा अमिताभचा कौतुकाने सांगण्यासारखा फ़क्त "आनंद" हा एकच पिक्चर रिलीज झाला होता.त्यातही त्याने रंगवलेला शांत,गंभीर डॉ.भास्कर बॅनर्जी पाहुन जयच्या रोलला हा कितपत न्याय देऊ शकेल अशी शंका कोणाच्याही मनात येणं स्वाभाविकच होतं.परंतु जया ऐकेनाच."अमितला घ्या नाहीतर मी राधाचा रोल accept करणार नाही".अशी धमकी दिल्यावर सिप्पी साहेब जरा नरमले आणि इतिहास घडायच्या दिशेने आणखी एक पाऊल पडलं!दुसरीकडे धर्मेंद्रची वर्णी पिक्चरमधे ऑलरेडी लागली होती पण ठाकुरच्या रोलसाठी.जेव्हा त्याला समजलं की वीरुच्या against हिरोईन हेमा असणार आहे त्याच क्षणी त्याने सिप्पीजवळ वीरुच्या रोलचा आग्रह धरला.त्या दिवसांमधे दोघांचं प्रेमप्रकरण अगदी जोरात चालू होतं आणि धर्मेंद्रला कसंही करुन हेमासोबत टाईम स्पेंड करणं जास्त महत्वाचं होतं:) शेवटी वीरुसाठी धर्मेंद्र आणि ठाकुरसाठी संजीव कुमारचा नंबर लागला.इतकं करुन एक महत्वाचा ऍक्टर अजुन निवडायचा राहीलाच होता.शोलेची जान,पिक्चरचा आत्मा असा गब्बरसिंग उर्फ़ हरीसिंगच्या अतिशय क्रुर व्यक्तिरेखेसाठी योग्य व्हिलनची निवड व्हायची होती.याची स्टोरी तर आणखीनच मजेदार आहे.आधी सिप्पीसाहेब डॅनीला approach झाले.डॅनी कसा,मुळातच व्हिलन दिसतो! ते त्याचे टिपिकल मिचमिचीत डोळे,बसकं नाक आणि एकंदरीत सिक्किममधे राहणाऱ्या लोकांसारखा लुक हे सगळे प्लस पॉईंट्स होते.नेमका तेव्हा तो फ़िरोज खानच्या धर्मात्मा साठी काम करत होता आणि तितक्या सलग तारखा त्याच्याकडे available नव्हत्या.त्यामुळे नाईलाजामुळे सिप्पीसाहेबांनी दुसरा चेहरा शोधायला सुरुवात केली.
५० च्या दशकातल्या फ़ार राजबिंड्या दिसणाऱ्या आणि कायम भारीतले रोल करणाऱ्या जयंत या veteran कलाकाराच्या मुलाला-अमजद खानला ही भुमिका द्यायचं ठरलं.तेव्हा जयंत जरी पिक्चरमधे काम करत नसले तरी असणारा मान हा वादातीतच होता.शिवाय बड्या अभिनेत्याचा मुलगा म्हणुन अमजदकडे तसंच भांडवल होतं.तरीदेखील आवाजामधे असलेला एक बारीक पोत बघता तो गब्बर सारख्या हिंस्त्र माणसाचा आवाज म्हणुन कितपत सुट होईल याबद्दल सिप्पीसाहेबांच्या मनात शंकाच होती.कसाबसा अमजद सिप्पीसाहेबांना convince करण्यात यशस्वी झाला व बघता बघता बाकी कलाकारांचं सिलेक्शन होऊन पिक्चर फ़्लोअरवर गेला!आपला कलाकार आणि तंत्रज्ञांचा ताफ़ा घेऊन सिप्पीसाहेब बंगळुरात दाखल झाले.त्या वेळी रामनगरम् हे फ़ारच छोटं गाव होतं आणि तिथे कसलीच सोय नव्हती.सर्वात प्रथम थोडाफ़ार गावाचा लुक आणि फ़ील येण्यासाठी आहे त्यात थोड्या अधिक घरांची भर घालुन साधारण गावाचा सेट उभा करण्यात आला.आज धर्मेंद्रचा one of the masterpiece समजला जाणारा "बुढीयां जेलमें जाईंग और चक्की पिसींग"वाला सीन शूट करण्याकरता बकायदा पाण्याची टाकी उभी करण्यात आली(जी नंतर गावकऱ्यांनी कायम वापरुन राहुन उपयोगात आणली).एक एक गोष्टी लागत गेल्या आणि शूटींगला सुरुवात झाली.शोले हा महान जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या’शिचिनीन नो सामुराई’अर्थात’द सेव्हन सामुराई’वर बेतलेला होता.असं जरी असलं तरी सिप्पीसाहेबांनी त्यात भरपुर भारतीय रंग मिसळले होते.मला वाटतं शोलेच्या यशामधे याचापण हातभार लागला असावा.जय आणि वीरु भुरटे चोर जरी असले तरी संकटात असलेल्या माणसाला मदत करण्याची माणुसकी ते विसरले नाहीयेत.म्हणुनच ट्रेनमधे दरोडेखोरांकडुन गोळीबार झाल्यामुळे जखमी झालेल्या ठाकुरला हॉस्पिटलला नेताना ते मागेपुढे पहात नाहीत.रामगढमधल्या ठाकुरच्या घरातुन पैसे चोरुन नेताना राधा जयला पकडते तेव्हा शरमेने किल्ली वापस करणारे जय आणि वीरुच असतात.गावामधे गब्बरच्या माणसांसोबतची झालेली पहिली चकमक जेव्हा आपली जोडी जिंकते,तेव्हा ठाकुर,गावकरी आणि प्रेक्षक सगळ्यांनाच जाणवतं की हे दोघं मिळुन गब्बरला किमान फ़ाईटतरी देऊ शकतील.उगाच नाही ठाकुर अभिमानाने गर्जना करत,"जाकर कह दो गब्बरसे,रामगढ्वालॊंने पागल कुत्तोंके सामने रोटी डालना बंद कर दिया है!!"व्वा!बघता बघता आपल्या जोडीचं नाव पंचक्रोशीमधे पसरु लागतं आणि गब्बरला त्याच्या ढिल्या होत जाणाऱ्या पकडीची जाणीव व्हायला लागते.तसा तो ताबडतोब उठतो आणि जातीने रामगढवर हमला करतो!
तिथेही जय आणि वीरु त्याचा नेटाने सामना करतात आणि सगळे प्लान्स उधळुन लावतात.शेवटी निर्णायक घाव घालायची वेळ येते.वीरु गब्बरच्या तावडीत सापडतो.बसंती मनोरंजनासाठी "जब तक है जान जाने जहां मै नाचुंगी" असं म्हणत जय येईपर्यंत वेळ काढते.शेवटच्या हातघाईच्या लढाईमधे सख्ख्या मित्रासाठी जय स्वत:च्या जीवाची पर्वा न करता किल्ला लढवत राहतो आणि सर्व काही ऒके आहे ह्याची खात्री करुन मित्राच्या मिठीतच आपले प्राण सोडतो! एका मुक प्रेमकहाणीचा झालेला अंत आपल्याला पहावा लागतो.चित्रपटाचा आता शेवट जवळ आला आहे.आयुष्यभराचे असलेले वैरी ठाकुर आणि गब्बर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत.हात नसलेला ठाकुर पाहुन गब्बरच्या जगायच्या आशा पुन्हा उंचावतात."आओ ठाकुर,अभीतक जिंदा हो?" असं म्हणत पुर्वी हिणवणाऱ्या गब्बरकडे पाहुन ठाकुरचे डोळे त्वेषाने भरतात.’बदले की आग’,’खुन का बदला खुन’वगैरे वगैरे सारे भाव त्यावेळी प्रेक्षकांना पहायला मिळतात.हात नसलेला ठाकुर गब्बरला कसा मारणार याबद्दलची असलेली प्रेक्षकांची उत्सुकता अगदी ताणली जाते.तोच "सापको हात से नही पैरोंसे कुचला जाता है गब्बर,पैरोसे!" असं म्हणत ठाकुर रहस्यभेद करतो.खिळे ठोकलेला बुट पाहुन गब्बरची पळापळ होते.याला आता ठाकुर कसा मारणार याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता अगदी ताणली जाते.दोन्ही हातांवर बुट रगडत गब्बरचे हात रक्तबंबाळ होताच आपले पोलिस मित्र तिथे पोचतात.पुर्वी इन्सपॅक्टर राहिलेल्या ठाकुरला पोलिस कानुनचे हात कसे आणि किती लांब आहेत याची जाणीव करुन देत गब्बरला आपल्या ताब्यात घेतात.इकडे परम मित्राच्या जाण्याने कष्टी झालेला वीरु खिन्न मनाने ट्रेनमधे बसायला निघतो तो बसंती त्याची वाट पहात डब्यामधे आधीच बसलेली असते!इथेच थांबत एका पॉझिटीव्ह एंडवर सिप्पी साहेब चित्रपट पुर्ण करतात.
सुमारे तीन तासांहुन अधिक काळ कथेशी समरस झालेले प्रेक्षक भारावुन हॉलच्या बाहेर पडतात.असा पिक्चर त्यांनी कधी पाहीलेला नसतो आणि असा पिक्चर परत कधी बनणार ही नसतो!शोले आज एक दंतकथा बनलेली आहे. तसे पाहता फ़ार काही स्पेशल नव्हतं त्यात.पण सगळं कसं जुळून आलं बरोब्बर.स्टोरी,अभिनेते,दिग्दर्शक तर होतेच पण संगीताने देखील आपला खारीचा वाटा उचलला होता.पंचमच्या कारकिर्दीमधल्या टॉप २० मधे पण शोले कुठे नसेल पण पिक्चरच्या फ़्लोमधे,’कोई हसीना जब रुठ जाती है’सारखे गाणेसुद्धा खपुन गेले.कौतुक करण्यासारखं फ़क्त ’मेहबुबा,मेहबुबा’होतं.मला तर वाटतं,गाण्यांपेक्षा background music जास्त भारी होतं शोलेचं.आठवुन बघा,गब्बरच्या entryला कसे चामड्याचे बुट कराकरा वाजतात,किंवा’ये हाथ नही फ़ांसी का फ़ंदा है’च्या वेळी जेव्हा संजीवकुमारचे डोळे गरागरा फ़िरत असताना मागचं काटा आणणारं म्युझिक!आणि सर्वात brilliant तर तो सीन आहे जेव्हा जया बत्ती विझवत असते आणि अमिताभ आपल्याच मस्तीत माउथऑर्गन वाजवत असतो..तो आवाज आणखीन उदास होत जातो,बत्ती विझत जाते आणि मग सारं संपतं!Great!!आपल्या पिक्चरच्या इतिहासात असं 1st टाईम झालेलं की गाण्यांच्या बरोबरीने डायलॉगच्या पण रेकॉर्डस निघाल्या होत्या.आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे डायलॉगच्या रेकॉर्डसचा खप जास्ती होता! एक एक कॅरॅक्टर अजरामर झालं आहे शोलेचं.मग तो सांभा असु देत,कालिया असु देत,"इतना सन्नाटा क्यों है भाई?"म्हणणारे ईमामचाचा असोत अथवा "हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है"वाले जेलरसाब असोत,सगळे जणं नंतर शोलेच्या पुण्याईवर जगले.रिलीज होऊन ३०-३५ वर्ष होऊनही शोले ताजा आहे.अजुनही हास्य कार्यक्रमाच्या लोकांना शोले पुरतोय.आपापल्या कल्पनाशक्तीला ताण देत सगले कलाकार शोलेला पिळुन काढताहेत.संपुर्ण पिक्चर पाठ असणारे लाखो लोकं आज भारतात असुनही शोलेबद्दल कुठेही काहीही ऐकु आलं की लगेच सगळे जणं कान टवकारुन बसतात!काय हवय आणखीन आपल्याला?"Movie of the century"चा सन्मान मिळवुन मोठ्या दिमाखाने "शोले" आज सर्वात उंचावरुन गम्मत बघत बसला आहे!!

2 comments:

Symphony of Chaos said...

aing ching chong ..english madhye lihi jara..marathi vachayla jara jad jaata.

Vishal Borgaonkar said...

Are uma,marathi madhe thoughts changle mandta yetat mala...english madhe titka proficient nahiye mi ajun ki asa kahi lihu shaken bharitla...ulat marathi vachun tuza aankhin sudharel..!